ठाणे : अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणात प्रकरण मार्गी लावून देण्यासाठी २ लाख ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कोकण विभाग ठाणे येथील अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती कार्यालयातील उपसंचालक (संशोधन) तथा सहआयुक्त व उपाध्यक्ष श्रीमती मीनाक्षी नारायण उन्हाळे (वय ४६) याना लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहात अटक केली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ५४ वर्षीय तक्रारदार यांनी आपल्या पत्नी व मुलीच्या अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणीची फाईल मंजूर करून देण्यासाठी आरोपी अधिकारी उन्हाळे हिने २.५० लाख रुपयांची मागणी केल्याची तक्रार १२ फेब्रुवारी २०२६ रोजी ACB रायगड युनिटकडे केली होती. त्यानंतर १३ फेब्रुवारी रोजी करण्यात आलेल्या पडताळणीत लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर १३ मार्च २०२६ रोजी सापळा रचण्यात आला. ठाण्यातील संबंधित कार्यालयातील स्वतःच्या केबिनमध्ये आरोपी उन्हाळे या तक्रारदाराकडून २.५० लाख रुपयांची लाच स्वीकारताना सायंकाळी ४.१० वाजता ACB पथकाने त्यांना रंगेहात पकडले.कारवाईदरम्यान आरोपीकडून लाचेची संपूर्ण रक्कम जप्त करण्यात आली असून संबंधित कागदपत्रेही ताब्यात घेण्यात आली आहेत. तसेच आरोपीचा मोबाईल फोन तपासासाठी जप्त करण्यात आला आहे. त्यांच्या राहत्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाणे, ठाणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा १९८८ च्या कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सरिता भोसले (ACB, रायगड) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
तपास पोलीस निरीक्षक निशांत धनवडे करत आहेत. या कारवाईवर पोलीस अधीक्षक शिवराज पाटील तसेच अप्पर पोलीस अधीक्षक भागवत सोनावणे व सुहास शिंदे यांचे पर्यवेक्षण होते.











