Drug Free India Week : अंमली पदार्थाविरोधी लढ्यात समाजाने सहभागी व्हावे ‘नशा मुक्त भारत सप्ताहा’च्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांचे आवाहन, ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत दोन वर्षांत नागपूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी
दि. १९ जून : “अंमली पदार्थांच्या विरोधातील लढा हा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसह समाजातील सर्वांना सोबत घेऊन युवापिढी अंमली पदार्थांच्या आहारी जाऊ नये, यासाठी आपण ‘ऑपरेशन थंडर’ ही मोहिम सुरु केली. याला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत असून ज्येष्ठ नागरिकही यासाठी पुढे सरसावले आहेत. अंमली पदार्थांची पुरवठा साखळी उद्ध्वस्त करण्यासोबतच युवकांमध्ये जनजागृतीवरही नागपूर पोलीस भर देत असून समाजाने या अंमली पदार्थविरोधी लढ्यात सहभागी व्हावे आणि पोलिसांना सक्रीय सहकार्य करावे”, असे आवाहन नागपूरचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी केले आहे.
Drug Free India Week विरोधी दिवस
२६ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ विरोधी दिवस आणि अवैध तस्करी विरोधी दिवस’ साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात १७ ते २६ जूनदरम्यान ‘Drug Free India Week – विकसित भारताची ओळख’ या संकल्पनेवर आधारित Drug Free India Week साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी नागपूरकरांना या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
Drug Free India Week अंमली पदार्थांची विक्री
नागपूर महानगराचा वाढता विस्तार, उपलब्ध होत असलेल्या विविध संधी यासोबतच काही समाजकंटकांकडून अंमली पदार्थांची विक्री व तस्करी करण्याचे प्रयत्न होत आहेत. अशा घटकांविरुद्ध आमची कठोर कारवाई सुरूच राहणार असून पालक, नातेवाईक आणि समाजातील सर्व घटकांनीही आपल्या पाल्यांकडे अधिक जबाबदारीने लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. सिंगल यांनी नमूद केले.
Drug Free India Week ऑपरेशन थंडर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस विभागाला अंमली पदार्थांबाबत ‘झिरो टॉलरन्स’चे धोरण अवलंबिण्याचे तसेच व्यापक प्रमाणात कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत. नागपूर पोलिसांनी मार्च, २०२४ मध्ये ‘ऑपरेशन थंडर’ या नावाने अभियान सुरु केले होते. या मोहिमेला उल्लेखनीय असे यश आले असून अभियानाच्या दोन वर्षांहून अधिकच्या कालावधित आतापर्यंत पोलिसांनी व्यापक स्तरावर केलेल्या कारवाईत अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत (NDPS) १ हजार गुन्हे दाखल करून तब्बल २१ कोटी ९४ लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत आतापर्यंत १ हजार ४३८ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
नागपुरात जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांमध्ये सर्वाधिक प्रमाण गांजा आणि एमडी (मेफेड्रोन) या अंमली पदार्थाचे आहे. पोलिसांनी १८५ प्रकरणामध्ये सुमारे १ हजार ४९९ किलो गांजा जप्त केला असून त्याची किंमत सुमारे ३.३६ कोटी रुपये आहे. या प्रकरणांत २७१ आरोपींना अटक करण्यात आली.
Drug Free India Week गुप्त माहिती
मेफेड्रोन (एमडी) या अंमली पदार्थाविरोधातील कारवाई देखील विशेष उल्लेखनीय ठरली असून १८९ गुन्ह्यांमध्ये १७ किलो ६९० ग्रॅम एमडीचे साठे जप्त करण्यात आले असून ३४३ आरोपींना अटक करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या या पदार्थाची किंमत सुमारे ११ कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगण्यात येते. याशिवाय डोडा, अफू, चरस, ब्राऊन शुगर आणि एलएसडी यांसारख्या इतर अमली पदार्थांच्या तस्करीविरोधातही पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. पोलिसांच्या आकडेवारीनुसार, या कालावधीत ७१९ अंमली पदार्थ सेवनकर्त्यांवरही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईसाठी प्रामुख्याने गुप्त माहितीच्या संकलनावर भर देण्यात येत आहे.
Drug Free India Week व्यक्तींचे पुनर्वसन
अंमली पदार्थाच्या आहारी गेलेल्या व्यक्तींचे पुनर्वसन केंद्रात पुनर्वसनही सुनिश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी दिली आहे.
अंमली पदार्थांच्या सेवनावर आळा घालण्यासाठी नागपूर पोलिसांकडून ‘ऑपरेशन यू-टर्न’ अंतर्गत अत्याधुनिक ड्रग डिटेक्टर मीटरच्या साहाय्याने सघन तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. विशेषतः पब, बार व इतर गर्दीच्या ठिकाणांबाहेर तपासणी करून अंमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.
हे देखील वाचा : Free Police Complaint Format In Marathi
nagpur city police official website : https://nagpurpolice.gov.in
जनजागृतीवरही भर
नागपूर पोलिसांच्या ‘ऑपरेशन थंडर’ अंतर्गत कारवाईसोबतच तरुण वर्गामध्ये जनजागृतीवरही भर दिला जात आहे. ‘पोलीस दीदी’ आणि ‘पोलीस काका’ अभियानाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस आणि पोलिस ठाण्याच्या पातळीवरील विविध वस्त्यांमध्ये जाऊन युवक व नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. अंमली पदार्थांचे दुष्परिणाम, त्यांचे कायदेशीर परिणाम आणि उपलब्ध पुनर्वसन सुविधांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.
अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या व्यसनाधीन व्यक्तींना पुनर्वसन केंद्रांमध्ये उपचारासाठी प्रोत्साहित करण्याच्या आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. नागरिकांकडून अंमली पदार्थ विक्री, सेवनाची ठिकाणे, पेडलर्स आणि संशयित हालचालींबाबत माहिती मिळवून त्यावर तातडीने कारवाई करण्याची यंत्रणाही सक्रिय करण्यात आली आहे. ‘व्यसनमुक्त नागपूर’ हा संदेशही या अभियानातून दिला जात आहे.
अंमली पदार्थांची विक्री, साठवणूक, वाहतूक किंवा सेवनाबाबत कोणतीही माहिती आढळल्यास नागरिकांनी तात्काळ नागपूर पोलिसांना कळवून या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी केले आहे.










