15 August Celebration, लाल किल्यावरील ‘आबादी-आबाद’ भाषणे आणि आदिवासी भागातील विदारक वास्तव
15 August Celebration निमित्त देशात स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा केला जाईल, स्वातंत्र्य प्राप्तीच्या 80 व्या वर्षांचा विकासाचा जल्लोष आणि भाषण 15 August रोजी लाल किल्ल्यावरून होईल. देशात सर्वत्र ‘आलबेल‘ असल्याचे भाषण देशाचे प्रधानमंत्री करतील आणि वृत्तवाहिन्या आपली शोधपत्रिका सोडून आपल्या गुलामगिरीचे प्रदर्शन करत सर्वत्र ‘आबादी-आबाद’ असल्याचे चित्र रंगवतील. परंतू या देशात आजही शिक्षण-आरोग्य-रोजगाराच्या क्षेत्रात भारत मोठ्या प्रमाणावर मागासलेला आहे.
जपतलाई आश्रमशाळेतील दुर्घटना: सर्पदंश कि भ्रष्ट व बेजबाबदार यंत्रणेचा बळी?
गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील आदिवासी आश्रमशाळेत झोपेत सर्पदंश झालेल्या आठ-दहा-बारा वर्षाच्या तीन आदिवासी कोवळ्या मुलींचा मृत्यू हा भ्रष्ट व्यवस्थेचा जीवंत नमूना आहे. या राज्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, मेळघाट, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदीया, नागपूर, अमरावती, यवतमाळ, पालघर सारख्या जिल्ह्यात आदीवासी समाज मोठ्या प्रमाणावर राहतो.
जंगलात जल-जंगल जमिनीची हजारो वर्षांपासून रक्षा करणारा हा समाज आज बेदखल झालेला आहे. जगलांचे रक्षण करणारा हा समाज आज त्या जंगलामधून ‘बेदखल’ केला जातो आहे. मग सरदार सरोवरच्या माध्यमातून असेल किंवा उद्योग उभारणीच्या माध्यमातून असेल या समाजाचे पुनर्वसन करण्यासाठीसुध्दा वर्षानुवर्षे जात आहेत. परंतू मेधा पाटकर सारख्या समर्पित जीवन जगणार्या समाजसेविकेमुळे या समाजाला थोडाफार कुठेतरी न्याय मिळतो आहे.
या समाजाच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न आजही मोठा आहे. त्यांना प्राथमिक शिक्षण मिळणे दुरापास्त झाले आहे. कारण शिक्षणाचे महत्वच सरकारने या समाजापर्यंत पोहोचविले नाही. तरूणांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. परंतू या अल्पशाः शिष्यवृत्तीतून खरोखरच महानगरामधून उच्च शिक्षण घेता येईल का? त्यामुळे या समाजातील तरूण-तरूणी आजही इच्छा असून शिक्षणापासून वंचित आहेत.
तरूण मोठ्या प्रमाणावर बेरोजगार आहेत.
आरोग्याच्या प्रश्न तर अजूनही खूप लांब आहे. रस्ते नसल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पोहचू शकली नाही म्हणून रस्त्यातच प्रसुती झालेल्या महिलांच्या बातम्या नेहमी येत असतात. मुलांच्या आश्रमशाळांमध्ये विषबाधा झाली, साप चावला, करंजीच्या बिया खाल्ल्या म्हणून विद्यार्थ्यांचा मृत्यू, विद्यार्थिनींचा मृत्यू अशा वृतांची देखील कमी नाही.
समाजकल्याण निधीची लुटालूट: संस्थाचालक कुरणे आणि अधिकाऱ्यांचे खिसे
समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून या आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांवर लाखो-करोडो रूपये खर्च केले जातात. परंतू त्या योजना त्या समाजापर्यंत पूर्णपणे पोहोचत नाहीत. त्या योजनांचा पैसा समाज कल्याण विभागातील अधिकारी, समाजकल्याण मंत्री यांच्या घरातील तिजोर्यांमध्ये अशा पध्दतीने जातो की ते कुणालाही कळत नाही. राहिला प्रश्न शासकीय आश्रमशाळा आणि खासगी आश्रमशाळांचा, तर या शाळा म्हणजे संस्था चालकांची चरण्याची ‘कुरणे’ झाली आहेत.
मुलांच्या तोंडातला घास काढून त्यातून ‘इमले’ उभे करणे आणि आपल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी विदेशात पाठविणे यासाठी या संस्थांच्या माध्यमातून अब्जावधी रूपये ‘हडप’ केले जात आहेत. म्हणून पाणी ‘मुरते’ कुठे आहे? याचा शोध घेण्याची गरज आहे. परंतू शोध घेणारे वरिष्ठ अधिकारी देखील प्रत्येक गोष्टीत पैसा मागतात. ‘तुम्ही पण खा, आणि आम्हाला ही खावू द्या’ अशी कार्यपध्दती सर्व राज्यात सुरू आहे.
सरकारी आश्रमशाळांची परिस्थिती तर भयावक आहे. या आश्रमशाळांमधील शिक्षक तर ‘मजेत’ आहेतच परंतू या शाळेतील व्यवस्थापन कर्मचारी मुलांच्या खाण्याचे तेलसुध्दा घरी घेवून जातात. रविवारी विद्यार्थ्यांची अंघोळ केली की त्यांचे डोक्याला थोडेच तेल लावण्यासाठी सुध्दा स्वतंत्रपणे काम केले जाते. म्हणजे मेलेल्या माणसाच्या ‘टाळूवरचे लोणी’ खाण्याचा प्रकार सर्रासपणे सुरू आहे. म्हणून राज्यातील शासकीय आश्रमशाळा असोत किंवा खासगी अनुदानित आश्रमशाळा असोत या केवळ पैसा खाण्यासाठी भ्रष्टाचाराचे ‘अड्डे’ झाले आहेत.

या ठिकाणी शिकणारी मुले ही निरागस आहेत. त्यांना जगाचे ज्ञान नाही, त्यांचे पालक अशिक्षित आहेत, त्यांना व्यवस्थेचे ज्ञान नाही. आपल्या मुलांचे हक्क माहित नाहीत. आणि म्हणून मंत्रालय ते समाज कल्याण अधिकारी सर्व भ्रष्ट व्यवस्थेचे ‘सरदार’ आहेत. म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आदिवासी आश्रमशाळेतील सर्पदंशाने मृत्यू पावलेल्या तीन विद्यार्थीनींचा बळी हा सर्पदंशचा नसून व्यवस्थेने घेतलेला ‘बळी’ आहे.
किमान सात-आठ मुलींना एक विषारी सर्प दंश करतो आणि जबाबादार यंत्रणा त्या ठिकाणी हजर नाही. किती बेजबाबदारपणे या आश्रमशाळा चालविल्या जातात याचा अंदाज येतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला अपेक्षित होते की या देशातील डोंगरदर्यांमध्ये राहणार्या शेवटच्या झोपडीतल्या शेवटच्या माणसापर्यंत शिक्षणाची किरणे पोहाचली पाहिजेत, आरेाग्यसेवा पोहोचली पाहिजे. परंतू आम्ही या सर्व आदिवासी जिल्ह्यांमध्ये हत्तीपाय, गलगंड सारखे आजार आजही कायम आहेत.
दरवर्षी शेकडो मुले कुपोषणाने मृत्यू पावतात. देशात दहा-वीस महामार्ग झाले, पाच-पन्नास रेल्वे स्टेशनचे आधुनिकीकरणी झाले, पाच-दहा विमानतळे झाली म्हणजे देश विकासाच्या महामार्गावर धावतो आहे असा समज मागील 12 वर्षात या देशात पसरविला जातो आहे. परंतू ज्या मुलभूत व्यवस्था उभ्या करण्याची गरज आहे, विकसित करण्याची आवश्यकता आहे त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते आहे.
हे देखील वाचा : आदिवासी विकास विभाग शिक्षक भरती : 2421 जागांसाठी बंपर भरती जाहीर!
शिक्षणाचा अधिकार कागदावरच सरकारी शाळा बंद पाडून खाजगीकरणाचा घाट?
या राज्यातील हजारो जिल्हा परिषदेच्या शाळा मागील दहा वर्षात बंद पडल्या. अर्थात त्या बंद पाडल्या जात आहेत. कारण देश अदानीला विकायचा आहे. देशाची अस्मीता एका अदानी-अंबानीच्या घरात ‘गहाण’ टाकली जाते आहे. ज्या शिल्लक शाळा आहे त्या ठिकाणी शिक्षक नाहीत, जिथे 4 शिक्षक हवेत त्याठिकाणी केवळ एका शिक्षकावर शाळा चालविली जाते आहे. कसल्या विकासाच्या गप्पा मारल्या जात आहेत ? या सरकारला देश खाजगीकरणाच्या माध्यमातून एकधिकारशाही पध्दतीने चालवायचा आहे.
घोषणाचा पाऊस अनतोंडाला पणे; तुटक्या झोपडीच्या आदिवासींना न्याय कधी?
त्यामुळे या राज्यातील आदिवासी हा केवळ 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यापूरता मर्यादित झाला आहे. मोठ-मोठ्या घोषणा करायच्या आणि आदिवासी बांधवाच्या तोंडाला ‘पाने’ पुसायची असा हा प्रकार आहे.
या समाजाच्या बळावर जे लोकप्रतिनिधी विधानसभेत व लोकसभेत पोहचत आहेत ते आपल्या साजातील लोकांच्या गळ्यावर आणि पोटावर पाय ठेवून कोट्यावधींची संपत्ती जमा करत आहेत. राज्यात शेकडो आश्रमशाळांमध्ाून लाखो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांच्यावर दरवर्षी अब्जावधी रूपये खर्च होत आहेत. परंतू यातील भ्रष्ट यंत्रणेमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या आणि विद्यार्थिनींचा बळी दिला जातो आहे.
दर्जाहीन व्यवस्थापन या आश्रमशाळांमध्ये असल्याने आजही या आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षित नाहीत. घटना घडल्यानंतर त्यांच्या कुटूंबाना पुन्हा सरकारच्या तिजोरीतून पैसा दिला जाईल. भ्रष्ट यंत्रणा मात्र तशीच कायम राहील आणि आमची ‘कोवळी’ मुले आमच्या ‘कोवळ्या’ मुली भ्र्रष्ट आणि दर्जाहीन व्यवस्थेच्या बळी जात राहतील.
घटना घडल्यावर आश्रमशाळांचे ऑडीट करण्याचे आदेश दिले जातील. आणि ऑडिट करणारी यंत्रणा पुन्हा पैशांची पाकिटे घेवून या दर्जाहीन आणि अपूर्ण आरोग्यदायी, सुरक्षिततेसाठी प्रचंड त्रुटी असलेल्या आश्रमशाळांना ‘उत्तम’ चा शेरा दिला जाईल. आणि 15 August रोजी लाल किल्ल्यावरून आदिवासींच्या जीवनात ‘क्रांती’ झाल्याच्या घोषणा दिल्या जातील. आणि ‘भारत माता की जय, वंदे मातरम’ म्हणून नेते आपल्या राजमहालात, संस्था चालक आपल्या शयन कक्षातील ‘सोन्याच्या’ पलंगावर आणि आदिवसी आपल्या ‘तुटक्या’ झोपडीत परत जातील. हे चित्र कधी बदलेल याची वाट आमचा समाजवादी मित्र बघतो आहे. तूर्तास एव्हढेच …!
- संबंधित विषय : 15 august independence day
- 15 august independence day speech
- What is on 15 August 2026?
- 15 august speech in marathi
- 15 august भाषण मराठी pdf
- 15 august Shayari