जंगलाच्या कुशीतून आकाशाकडे आदिवासी विद्यार्थीची झेप…गडचिरोलीच्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवे पंख,राष्ट्रपती भवन, संसद ते आयआयटी-विज्ञान केंद्र; jagtik adivasi din vishesh शैक्षणिक अभ्यास दौऱ्यांतून दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसमोर खुली होताहेत नव्या संधींची क्षितिजे
ज्या आदिवासी मुला-मुलींसाठी कधीकाळी जिल्ह्याचे ठिकाण गाठणेही मोठी गोष्ट होती, त्याच दुर्गम आदिवासी भागातील नवी पिढी आज विमानाने दिल्ली-मुंबई, हैदराबाद आणि बंगलोर गाठत आहे. देशाच्या राष्ट्रपतींशी संवाद साधत आहे, संसद भवन पाहत आहे, आयआयटी, इस्रो आणि विज्ञान केंद्रांना भेट देत आहे, मंत्रालय-विधानभवनाची कार्यपद्धती समजून घेत आहे. आपल्या गावाच्या, जंगलाच्या आणि परिचित परिसराच्या पलीकडे संधींचे किती विशाल विश्व आहे, हे ती प्रत्यक्ष अनुभवत आहे.
jagtik adivasi din vishesh : गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांची प्रेरणादायी गगनभरारी
गडचिरोलीच्या दुर्गम आदिवासी भागातील एका विद्यार्थ्याने राष्ट्रपती भवनात भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्यासमोर आत्मविश्वासाने उभे राहून, “मला शिक्षक व्हायचे आहे,” असे सांगणे हा या परिवर्तनाचा बोलका क्षण आहे. त्यावर राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि शिक्षण, मेहनत व चिकाटीच्या बळावर ती पूर्ण करण्याचा प्रेरणादायी संदेश दिला.
ही केवळ एका आदिवासी विद्यार्थ्याची गोष्ट नाही. ही आदिवासीबहुल गडचिरोलीच्या नव्या पिढीच्या बदलत्या आकांक्षांची गोष्ट आहे. आपल्या समृद्ध संस्कृतीची मुळे जपत शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान आणि आधुनिक संधींच्या दिशेने आत्मविश्वासाने पुढे जाणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या नव्या प्रवासाची ही सुरुवात आहे.
आदिवासी विद्यार्थ्यांसाठी संधींचे नवे आकाश
महाराष्ट्राच्या पूर्व टोकावर वसलेला गडचिरोली हा आदिवासीबहुल, वनव्याप्त आणि प्रामुख्याने ग्रामीण जिल्हा. घनदाट जंगले, नद्या-नाले, विपुल वनसंपदा आणि समृद्ध आदिवासी संस्कृती ही या जिल्ह्याची ओळख आहे. मात्र भौगोलिक दुर्गमतेमुळे अनेक गावांतील नागरिकांचा मोठ्या शहरांशी प्रत्यक्ष संपर्क मर्यादित राहिला आहे. आजही दुर्गम भागातील अनेक नागरिकांनी जिल्हा मुख्यालय पाहिलेले नाही; नागपूर, मुंबई किंवा दिल्लीसारख्या महानगरांचा प्रत्यक्ष अनुभव तर अनेकांसाठी दूरची बाब आहे.
या भौगोलिक अंतरामुळे आदिवासी मुलांच्या गुणवत्तेला किंवा क्षमतेला मर्यादा नसल्या, तरी त्यांच्या अनुभवविश्वाला मर्यादा येऊ शकतात. हीच दरी कमी करण्यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासनाकडून शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.
मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाबरोबरच दुर्गम व आदिवासी भागातील नव्या पिढीला गुणवत्तापूर्ण शिक्षण, आधुनिक ज्ञान आणि व्यापक अनुभवाच्या संधी उपलब्ध करून देण्यावर विशेष भर दिला जात आहे. या व्यापक प्रयत्नांचाच एक भाग म्हणून विविध विभागांच्या माध्यमातून आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना विमानाने देशातील महानगरांमध्ये शैक्षणिक अभ्यास दौऱ्यांची संधी उपलब्ध करून देण्यात आली.
उद्देश केवळ मोठी शहरे दाखविण्याचा नाही; तर देशातील आधुनिक पायाभूत सुविधा, विज्ञान-तंत्रज्ञानातील प्रगती, उच्च शिक्षणाच्या संधी, लोकशाही व प्रशासकीय व्यवस्था आणि ऐतिहासिक-सांस्कृतिक वारसा प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी देऊन येथील विद्यार्थ्यांच्या आकांक्षांना नवे क्षितिज देण्याचा आहे.
*तीन विभाग… गडचिरोलीत विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकच ध्येय*
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मागील तीन वर्षात गडचिरोली जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या एकूण ३६० विद्यार्थ्यांना विमानाने हैदराबाद, बंगळुरू व यावर्षी दिल्लीच्या शैक्षणिक अभ्यास दौऱ्याची संधी दिली.
- यातील अनेक विद्यार्थ्यांसाठी विमानप्रवासाचा हा पहिलाच अनुभव होता. नागपूर विमानतळावरून दिल्लीकडे विमानाने झेपावताना त्यांच्या चेहऱ्यावरील कुतूहल आणि आनंद त्यांच्या अनुभवविश्वात घडत असलेल्या बदलाची साक्ष देत होता.
- दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन, संसद भवन आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या विविध स्थळांना भेट देऊन विद्यार्थ्यांनी देशाची लोकशाही व्यवस्था, इतिहास, संस्कृती आणि विकासाचे विविध आयाम समजून घेतले.
*राष्ट्रपतींसमोर आदिवासी विद्यार्थीनी मांडली भविष्याची स्वप्ने*
आदिवासी विकास विभागाने जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजनेतून गडचिरोली, अहेरी आणि भामरागड येथील शासकीय आश्रमशाळांमधील 96 आदिवासी आदिवासी विद्यार्थीसाठी दिल्ली शैक्षणिक अभ्यास दौरा आयोजित केला.
या दौऱ्याचा सर्वाधिक प्रेरणादायी क्षण ठरला तो राष्ट्रपती भवनातील भेटीचा.
भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोलीच्या आदिवासी विद्यार्थीचे आत्मीयतेने स्वागत केले. त्यांनी विद्यार्थ्यांची नावे, गावे, शिक्षण आणि भविष्यातील ध्येय जाणून घेतले. पोटेगाव येथील एका विद्यार्थ्याने शिक्षक होण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच्या स्वप्नाचे कौतुक करत राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा संदेश दिला.
देशाच्या एका दुर्गम आदिवासी गावातून आलेला आदिवासी विद्यार्थी राष्ट्रपती भवनात देशाच्या प्रथम नागरिकांसमोर उभा राहून आत्मविश्वासाने आपल्या भविष्याचे स्वप्न सांगतो—हा बदलत्या गडचिरोलीचा आणि नव्या आकांक्षांनी भरलेल्या आदिवासी पिढीचा अत्यंत आश्वासक क्षण आहे.

या विद्यार्थ्यांनी संसद भवन, पंतप्रधान संग्रहालय, राष्ट्रीय विज्ञान केंद्र, आयआयटी दिल्ली, जंतरमंतर, राजघाट, लाल किल्ला, कुतुबमिनार आणि राष्ट्रीय प्राणीसंग्रहालयालाही भेट दिली. लोकशाहीपासून विज्ञानापर्यंत आणि इतिहासापासून उच्च शिक्षणापर्यंत देशाच्या विविध क्षेत्रांची ओळख त्यांना प्रत्यक्ष अनुभवातून झाली.
‘मिशन जिकतूर’ : गुणवत्तेतून संधी, संधीतून आकांक्षा
जिल्हा परिषद गडचिरोलीने ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘मिशन जिकतूर’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. या अंतर्गत शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील जिल्हा परिषद शाळांच्या विद्यार्थ्यांना विमानाने मुंबईच्या शैक्षणिक अभ्यास दौऱ्यावर नेण्यात आले.
दौऱ्यात विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव तथा गडचिरोलीचे पालकसचिव राजेश अग्रवाल यांच्याशी संवाद साधून शिक्षक, डॉक्टर, कलेक्टर आणि पोलीस अधिकारी होण्याची स्वप्ने मांडली. तसेच मंत्रालय, विधानभवन, गेटवे ऑफ इंडिया, नेहरू विज्ञान केंद्र, तारांगणासह विविध ऐतिहासिक व शैक्षणिक स्थळांना भेट दिली.
‘मिशन जिकतूर’अंतर्गत शिष्यवृत्ती व नवोदय प्रवेश परीक्षेची विशेष तयारी, तज्ज्ञ मार्गदर्शन, ओएमआर सराव आणि शिक्षकांचे उद्बोधन याद्वारे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला संधी आणि त्यांच्या आकांक्षांना नवी दिशा दिली जात आहे. jagtik adivasi din vishesh
हे देखील वाचा : ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन समृद्ध संस्कृतीबद्दल
या उपक्रमांचे मूल्यमापन केवळ किती विद्यार्थ्यांनी विमानप्रवास केला किंवा किती स्थळांना भेट दिली एवढ्यावर करता येणार नाही. त्यांचा खरा परिणाम आदिवासी आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या विचारविश्वात व आकांक्षांमध्ये शोधावा लागेल. jagtik adivasi din vishesh
एखाद्या मुलाला ‘वैज्ञानिक हो’ असे सांगणे आणि त्याला प्रत्यक्ष विज्ञान केंद्र किंवा संशोधन संस्था दाखविणे यात फरक आहे. ‘मोठा अधिकारी हो’ असे सांगण्यापेक्षा संसद भवन, राष्ट्रपती भवन, मंत्रालय किंवा विधानभवनाची व्यवस्था प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी देणे अधिक परिणामकारक आहे. आयआयटीचे नाव पुस्तकात वाचण्यापेक्षा त्या संस्थेच्या परिसरात उभे राहिल्यावर ‘मीसुद्धा एक दिवस येथे शिकू शकतो’ हा विचार मनात निर्माण होणे अधिक महत्त्वाचे आहे.
विकास म्हणजे केवळ रस्ते, पूल, वीज आणि इमारती नव्हेत. विकास म्हणजे संधींची दारे खुली होणे, स्वतःच्या क्षमतेची जाणीव निर्माण होणे आणि ‘मीसुद्धा हे करू शकतो’ हा आत्मविश्वास आदिवासी समाजाच्या नव्या पिढीच्या मनात रुजणे. jagtik adivasi din vishesh
हे देखील वाचा : विश्व आदिवासी दिवस का पुरा इतिहास पढे:
आदिवासी संस्कृतीची मुळे जपत आधुनिकतेच्या दिशेने.
गडचिरोलीच्या आदिवासी समाजाची स्वतंत्र जीवनपद्धती, भाषा, लोककला, परंपरा, सामूहिक जीवनमूल्ये आणि निसर्गाशी असलेले अतूट नाते ही जिल्ह्याची अमूल्य संपदा आहे. आधुनिक विकास म्हणजे हा वारसा मागे सोडणे नव्हे. आपल्या संस्कृतीची मुळे अधिक घट्ट पकडून आधुनिक शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान आणि नव्या संधींचे आकाश पुढील आदिवासी पिढीसाठी खुले करणे, हा विकासाचा अधिक व्यापक अर्थ आहे. jagtik adivasi din vishesh
जागतिक आदिवासी दिन हा आदिवासी समाजाच्या अस्मितेचा, संस्कृतीचा आणि समृद्ध परंपरांचा गौरव करण्याचा दिवस आहे; त्याचवेळी आदिवासी समाजाच्या नव्या पिढीच्या शिक्षणाचा, आकांक्षांचा आणि भविष्याचा विचार करण्याचाही हा दिवस आहे. jagtik adivasi din vishesh
आज गडचिरोलीतील आदिवासी विद्यार्थी आपल्या गावाच्या सीमा ओलांडून देशाच्या सर्वोच्च संस्थांपर्यंत पोहोचत आहेत. राष्ट्रपतींशी संवाद साधत आहेत. संसद भवनात देशाची लोकशाही समजून घेत आहेत. आयआयटी आणि विज्ञान केंद्रांमध्ये उद्याच्या संधी शोधत आहेत. jagtik adivasi din vishesh
मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि विविध शासकीय विभागांच्या प्रयत्नांतून गडचिरोलीतील आदिवासी व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण आणि अनुभवाची नवी क्षितिजे खुली होत आहेत. jagtik adivasi din vishesh
गडचिरोली भौगोलिकदृष्ट्या दुर्गम असू शकतो; पण येथील आदिवासी मुलांची स्वप्ने आता दुर्गम राहिलेली नाहीत. जंगलाच्या कुशीतल्या शाळेतून सुरू झालेला त्यांचा प्रवास राष्ट्रपती भवन, संसद, आयआयटी, इस्रो आणि विज्ञान केंद्रांपर्यंत पोहोचला आहे. आपल्या मातीशी, आदिवासी संस्कृतीशी आणि मुळांशी नाते जपत आधुनिक ज्ञानाची क्षितिजे खुली करणे—जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने गडचिरोलीत घडणाऱ्या परिवर्तनाचा हाच खरा अर्थ आहे. jagtik adivasi din vishesh
विमानाने कापलेले अंतर काही तासांचे असते; मात्र या प्रवासाने आदिवासी विद्यार्थीच्या मनातील अंतर कितीतरी मोठ्या प्रमाणात कमी होते. ‘आपले गाव दुर्गम असले, तरी आपली स्वप्ने दुर्गम असण्याची गरज नाही’ ही आदिवासी विद्यार्थ्यांच्या मनात रुजणारी जाणीवच गडचिरोलीच्या उज्ज्वल भविष्याची खरी सुरुवात आहे. गजानन जाधव, जिल्हा माहिती अधिकारी गडचिरोली. jagtik adivasi din vishesh